कोल्हापूरी स्पेशल तांबडा - पांढरा रस्सा
कोल्हापूरची ओळख व खासीयतच आहे, तांबडा पांढर्या रस्साची. 'कुस्ती मध्ये तांबड्या मातीत खेळणारा पैलवान
आणि ऊसाच्या रसापासून बनवलेला पांढरा गुळ', याचेच उदाहरण म्हणजे हा तांबडा आणि पांढरा!
नॉनवेज खाणार्यांसाठी मेजवानीच जणू, कोल्हापूर मध्ये प्रसिद्धीत असणार्या यादीमध्ये हे दोन वेगळे वेगळे रस्से तांबडा आणि पांढरा अतिशय प्रसिद्ध असून लोक यावर ताव मारत असतात.
घरी आलेल्या पाहुण्यांना हा तांबडा पांढरा रस्सा खाऊ नाही घातला तर तो पाहुणचार कसला?
लाल मातीत कसलेली, झणझणीत, तिखट, तर्रीवाल्या जेवणावर ताव मारून कोल्हापूरी रग मिरवणारी अस्सल कोल्हापूरकर तिथल्या ऊसाच्या गोडव्यासारखीच गोड सुद्धा आहेत. पण आज आपण झणझणीत तिखट तांबडा आणि पांढरा रस्सा करणार आहोत.
कोल्हापूरी स्पेशल तांबडा रस्सा
साहित्य :
१/२ किलो मटण, ४ मोठे कांदे, २ टोमॅटो, २/३ चमचे आलं-लसूण पेस्ट, १/२ ओला नारळ, हळद, २ चमचे तीळ, १/२ चमचा जिरं, कोल्हापूरी लाल तिखट, मीठ, कोथिंबीर.
अख्खा मसाला : २/३ लवंगा, १ तुकडा दालचिनी, २/३ काळेमिरी, २ हिरवी वेलची, १ मसाला वेलची, तमालपत्र, १ चक्रफूल
कृती:
१) प्रथम मटण स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ, आलं-लसूण पेस्ट लावून १/२ तास ठेवा.
२) एका भांड्यात २ चमचे तेल घालून बारीक चिरलेला १ कांदा परतवून १ टोमॅटो सुद्धा त्यात परतून घ्या. टोमॅटो विरघळेपर्यंत परतवून त्यात मॅरीनेट केलेले मटण घाला आणि त्यावर प्लेट ठेवून त्यावर पाणी घालून ते पाणी गरम झाल्यावर त्यात ओतत राहा अशा पद्धतीने मटण शिजवून घ्यावे.
३) रस्सा करण्यासाठी २ कांदे उभे बारीक चिरून घ्यावे, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, ओला नारळ खोवून घ्यावा.
४) एका कढईत २ चमचे तेल घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा, त्यातच खोवलेला नारळ परतवून घ्यावा, आता त्यामध्ये तीळ-जीरे व सर्व अख्खा मसाला घालून परतवून घ्यावा.
५) हे सर्व मसाले आणि कोथिंबीर घालून एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटण करून घ्यावे. टोमॅटो प्युरी करून घ्यावी.
६) मटण शिजल्यानंतर ते रस्सा बनवण्यासाठी दुसरी फोडणी तयार करावी.
७) दुसर्या एका भांड्यात २ मोठे चमचे तेल घालून, कांदे लालसर परतवून घेणे.
८)त्यामध्ये वरील तयार केलेले वाटण चांगले तेल सुटेपर्यंत परतावे व त्यात कोल्हापूरी तिखट मसाला घालून शिजवून घेतलेले मटण आणि चवीनुसार मीठ घालून रस्साला चांगला कट येईपर्यंत उकळू द्यावे.
कोल्हापूरी स्पेशल पांढरा रस्सा
साहित्य :
१/२ किलो मटण, ३ चमचे तूप, ३ चमचे तेल, १ नारळ, २० काजूगर, ३ चमचे खसखस, ५ चमचे पांढरे तीळ, ५० ग्रॅम मगज बी, २ मोठे कांदे, आले-लसून पेस्ट, २ हिरवी मिरची, चवीपुरते मीठ,
अख्खा मसाला - ४/५ लवंगा, १ तुकडा दालचिनी, ४/५ काळेमिरी, ४ हिरवी वेलची, २ मसाला वेलची, तमालपत्र
कृती :
१) प्रथम मटण स्वच्छ धुवून घ्यावे. त्याला आलं - लसूण पेस्ट व थोडे मीठ लावून १/२ तास ठेवून द्यावे.
(टिप : पांढरा रस्सा करताना मटणास हळद लावू नये.)
२) एका ओल्या नारळाचे दूध तयार करून घ्यावे.
३) काजू-तीळ-खसखस-मगज बी गरम पाण्यात एक उकळी काढून त्यातील पाणी काढून टाकावे.
४) काजू-तीळ-खसखस-मगज बी थंड झाल्यावर स्वच्छ धुवून घ्यावे व काजू-तीळ-खसखस-मगज बीयांची पेस्ट तयार करून घ्यावी.
(असे केल्याने रस्सा पांढरा होईल.)
५) एका भांड्यात तेल गरम करुन बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर भाजून, मॅरीनेट केलेले मटण फोडणी घालावे व भांड्यावर झाकण ठेवून त्यामध्ये पाणी ठेवून मटण शिजवून घ्यावे.
६) आता एका पातेल्यात तूप गरम करून त्यामध्ये लवंग, दालचिनी, काळेमिरी, हिरवी वेलची, मसाला वेलची, हिरवी मिरची मधून चिरुन, तमालपत्र, फोडणीला घाला.
७) अख्खा मसाला घालून चांगले परतून त्यामध्ये आले-लसून पेस्ट आणि काजू-तीळ-खसखस पेस्ट घालून चांगले एकजीव परतून घ्या.
८) आता त्यामध्ये नारळाचे दूध घालून चांगले ढवळून त्याला उकळी न येऊ देता शिजवलेले मटण व त्याचे पाणी (मटण स्टाॅक) घालून पांढरा रस्सा तयार करून घ्यावा.
तुम्हाला इतक्या डिटेल्स मध्ये रेसिपी उपलब्ध करून देणे हे माझ्या वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे सोप होत आहे. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या आहेत, ते कळवा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
आज
कोल्हापूरी स्पेशल तांबडा - पांढरा रस्सा ताव माराच!