Friday, June 26, 2020

Dalgona Coffee



     आज मूड कॉफी पिण्याचा झाला, मग करुयात का कॉफी! यात तर बरेच ओप्शन्स आहेत, ब्रू, इन्स्टंट, हॉट, कोल्ड...... आणि हे तर आपल्या ओळखीतलेच आहेत, पण याच्याही पुढे अजुन व्हरायटी आहेत बरं.

     फ्रॅप्रे, मोचा, कॅपेचीनो, डालगोना आणि बरेच काही....  नाव सुद्धा घ्यायला जमत नाही इतकी यादी आहे या कॉफीची आणि आपण या कॉफी घरीच बनवणार आहोत.

     काही अवघड नाही....  मी शिकवेण तुम्हाला ह्या महागड्या कॉफी, अगदी झटपट आणि  CCD (CAFE COFFEE DAY)  मध्ये मिळतात तशा.

डालगोना :



     आज सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असलेली ही डालगोना मी खूपदा केली. दक्षिण कोरियामध्ये प्रचलित असलेली ही डालगोना कॉफी आपल्याकडे लाॅकडाउनच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल झाली. टिकटॉकच्या माध्यमातून #dalgonnacoffeechallenge द्वारे आज घरघरात डालगोना कॉफी प्रसिद्ध झाली.

साहित्य :
३ चमचे कॉफी (कोणत्याही ब्रँडची चालेल), ३ चमचे साखर, ३ चमचे गरम पाणी, १ ग्लास दूध, (उपलब्ध असल्यास चोको चिप्स, कोको/काॅफी पावडर)

कृती :
१) प्रथम पाणी गरम करून घ्यावे.
२) कॉफी, साखर, आणि गरम पाणी सम प्रमाणात 3/3/3 चमचे घेऊन ते चांगले फेटून घ्यावे. (एग बिटर किंवा ब्लेंडर मशीनच्या सहाय्याने फेटून घ्यावे.)
३) गरम दुधात साखर घालून वरतून फेटलेले कॉफीचे मिश्रण ओतावे.
४) गार्नीशींगसाठी वरतून चोको चिप्स आणि कोको/काॅफी पावडर घालावी.



हॉट डालगोना कॉफी 

१ ग्लास कोमट दुधात साखर घालून वरतून फेटलेल्या कॉफीचे मिश्रण घालून डेकोरेशनसाठी चॉकलेटचे तुकडे किंवा चोको चिप्स टाकून सर्व्ह करावी.

कोल्ड डालगोना कॉफी

१ ग्लास थंड दूधामध्ये साखर घालून, दोन -चार बर्फाचे खडे घालावे व वरतून फेटलेल्या कॉफीचे मिश्रण घालावे व वरतून चॉकलेट सॉस घालून किंवा विप क्रिम घालून सर्व्ह करावे.

वा.......कोसळणारा पाऊस आणि मस्तच अशी फेसाळलेली गरम गरम कॉफी, क्या बात है........

Wednesday, June 17, 2020

Scotch Eggs


   
     साम टिव्हीच्या एका एपिसोड मध्ये ही रेसिपी मी केली आहे. आज खास तुमच्यासाठी बनवणार आहोत, नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारात, स्काॅच एग्ज......

     खरतर याची रेसिपी आम्ही आमच्या 'बेकिंग अँड कन्फेशनरी' च्या क्लासेसमध्ये अमित महिंद्रकर सरांकडून शिकले.

स्काॅच एग्ज




साहित्य :

५ अंडी, चिकन खिमा पाव किलो, २ कांदे, १ चमचा आलं - १ चमचा लसूण, २/३ हिरवी मिरची (बारीक चिरून), १ चमचा मिक्स हर्ब, १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, १/२ चमचा मस्टर मेयॉनीज, २ चमचे मैदा, १ वाटी ब्रेड क्रम्स, पार्स्ले/ कोथिंबीर, मीठ, तळण्यासाठी तेल

कृती :

१) प्रथम ४ अंडी उकडून घ्यावी.

२) चिकन खिमा घेऊन त्यामध्ये कांदे, आलं, लसूण, हिरवी मिरची, मिक्स हर्ब, ब्लॅक पेपर पावडर, मस्टर मेयॉनीज, पार्स्ले किंवा कोथिंबीर, व मीठ घालून एकजीव करून घ्यावे.

३) उकडलेली अंडी थंड झाल्यावर कवच काढून थंड करून घ्यावीत.
४) १ अंडे फेटून घ्यावे.
५) १ उकडलेले अंडे मैद्यामध्ये घोळवून घ्यावे. ( मैद्यामध्ये थोडं मीठ व ब्लॅक पेपर पावडर मिसळून घ्यावी.)
६) मैद्यामध्ये घोळवलेले अंडे फेटलेल्या अंड्यामध्ये घोळवून परत एकदा मैद्यामध्ये घोळवून घ्या.
७) आता हाताला थोडं तेल लावून चिकन खिमाची एक गोळी घ्यावी व ती लाटून घ्यावी.
८) लाटलेल्या चिकन खिमामध्ये अंडे मधोमध ठेवून त्याचा  अंड्याच्या आकाराच्या शेपमध्ये गोळा करून घ्यावे.



९) हे स्काॅच एग्ज फेेटलेल्या अंड्ययामध्ये बुडवून, ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावे.

१०) तयार केलेले स्काॅच एग्ज तळून घ्यावे. व खाण्यासाठी एखाद्या डिपसोबत द्यावे.

स्काॅच एग्ज 


 
      नेहमीच्या रेसिपीपेक्षा थोडे काहीतरी वेगळं करायला काहीच हरकत नाही. 

Saturday, June 13, 2020

Stuff Potato Rice Balls

   

     मी नेहमीच एखादा नवीन पदार्थ बनवताना त्यामध्ये एखादा ट्विस्ट काही करता येईल का हे पाहत असते. आज मी जो मधल्या वेळेत चहासोबत खाता येईल असा पदार्थ बनवणार आहे. तो म्हणजे 'स्टफ पोटॅटो राईस बॉल्स', तसे तुम्ही कधी ही खाऊ शकता. हा पदार्थ मी पहिला केला तेव्हा फक्त 'राईस बॉल' केला होता, नंतर त्यामध्ये थोडं ट्विस्ट म्हणजे, घरी बटाट्याची भाजी शिल्लक होती त्यातून सुचलेला प्रयत्न, अगदी झकास झाला. तुम्ही देखील करून पहा 'स्टफ पोटॅटो राईस बॉल्स'......

स्टफ पोटॅटो राईस बॉल्स :



साहित्य :

तांदळाचे पीठ १ वाटी, तयार बटाट्याची भाजी, १/२ चमचा जीरे, फोडणी साठी मोहरी, कडीपत्ता, २ हिरव्या मिरच्या, १/२ लिंबाचा रस, १ चमचा तेल, कोथिंबीर 


कृती :

१) प्रथम तांदळाचे पीठ गरम पाण्यात घट्ट मळून घेणे. (मोदकाला करतो तसे, व्हिडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे) 
२) पीठ थोडं थंड झाल्यावर त्याची मोदकासारखी पारी करून त्यामध्ये बटाट्याची भाजी घालावी व गोल बॉल्स करून घ्यावे. 
३) या पद्धतीने सर्व राईस बॉल्स तयार करून घ्यावे. 
४) आता एका कढईत तेल गरम करून जीरे, मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरची फोडणीला टाकावे. 
५) कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये लिंबूचा रस घालून परतवून घ्यावे.
६) तयार राईस बॉल्स त्यामध्ये घालून परतवून घ्यावे, व वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.


    मुलं तर मस्त गट्टम करतात हे स्टफ पोटॅटो राईस बॉल्स.

Sunday, June 7, 2020

Chilli Rava Appam



     रोज रोज नाश्ता काय करायचा हा एक प्रश्नच आहे.  आणि जर का घरात लहान मुले असतील तर खूपच अवघड प्रश्न होवून बसतो.  आपण रोज एक एक रेसिपी म्हणजे कांदापोहे, उपमा, डोसे, इडली पासून ते मॅगी, पास्ता इथपर्यंत सर्व काही बनवतो. तरी या मुलांना काही तरी वेगळ हव असत, म्हणून थोडा झटपट ट्विस्ट....
     ब्रेकफास्टसाठी थोडी हटके रेसिपी जी मुलांना खूपच आवडेल आणि मुलंच काय तर आपण देखील आवडीने खाऊ शकतो.

चिली रवा अप्पम / Chilli Rava Appam



अप्पम साहित्य :

२ वाटी रवा, २ कांदे, १ टोमॅटो, २ चमचे दही, ३/४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चिमूटभर खायचा सोडा, मीठ

कृती :

१) रवा स्वच्छ करून तो भिजवून घ्यावा.

२) त्यातील पाणी काढून, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ व खायचा सोडा घालून १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे.

३) २० मिनीटानंतर बॅटर चांगले फेटून आप्पे पात्रामधून अप्पम बनवून घ्यावे.

चिली ग्रेव्ही

साहित्य :
१ सिमला मिरची (बारीक चिरून), २ कांदे (बारीक चिरून), २ चमचे टोमॅटो केचअप, २ चमचे सोया सॉस, १ कांदा पात, १ गाजर, १०/१२ लसूण पाकळ्या, १ चमचा कॉर्न फ्लोअर, २ चमचे तेल (लाॅकडाउनमुळे कांदा पात व गाजर मिळाले नाही. तुम्हाला मिळाल्यास वापरू शकता.)

कृती :

१) तेल गरम करून कांदा परतवून घ्या.
२) आता सिमला मिरची परतवून घ्या. (गाजर असल्यास ते देखील परतवून घ्या.)
३) लसूण बारीक चिरून त्यामध्ये परतवून घ्या.
४) आता टोमॅटो केचअप व सोया सॉस घालून परतवून घ्या.
५) १/२ ग्लास पाणी घालून मिश्रण हलवत रहा.
६) कॉर्न फ्लोअर मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून ती वरील ग्रेव्हीमध्ये घालून मिश्रण सतत ढवळत रहावे.
७) तयार ग्रेव्हीमध्ये अप्पम घालून ते एकत्र मिक्स करुन घ्यावे व ब्रेकफास्टसाठी वरतून कांदा पात घालून गरमा गरम सर्व्ह करावे.
(खाली संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ दिलेला आहे.)



नुसते अप्पम-चटणी मुलांना दिली तर ते नाक मुरडतात, म्हणूनच थोडा चायनीज टचचा ट्विस्ट !

Friday, June 5, 2020

ढाबा स्टाईल अख्खा मसूर : Dhaba Style AKKHA Masoor


     बरेचजण आज काय स्पेशल? असे सारखेच विचारु लागलेत.  अहो रोज रोज थोडी स्पेशल बनवणारे आपण? एखादं वेळ ठिक आहे, सणवार आहेतच स्पेशल बनवण्यासाठी.
     रोज आपली पोळी, भाजी, आणि डाळ, भात हाच बेत!
माझ्या रेसिपीमध्ये थोडा फार फरक असेलच, कारण मी ज्या रेसिपी करते त्या माझ्या स्वतःच्या पद्धतीने आणि इनोव्हेटिव्ह असतात.
     आज बनवली जाणारी रेसिपी ही आपल्या रोजच्या मेन्यूमध्येसुद्धा समाविष्ट असून जी खुप प्रसिद्ध सुद्धा आहे आणि ढाब्यावर जाऊन खाणार्‍यांची गर्दी देखील भरपूर आहे, ती म्हणजे अख्खा मसूर........

अख्खा मसूर




साहित्य : 

१ वाटी अख्खी मसूर डाळ, २/३ कांदे, २ टोमॅटो, ८/१० पाकळ्या लसूण, १ चमचा काश्मिरी लाल तिखट, १ चमचा आलं -लसूण पेस्ट, जिरे, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर, अमूल फ्रेश क्रीम सजावटीकरिता

खडा मसाला : २ लवंग, २ वेलची, १ स्टार फूल, २ तमाल पत्र, १ दालचीनी, १/२ चमचा जीरे


कृती :

१) प्रथम २/३ तास अख्खा मसूर स्वच्छ धुवून भिजवून घ्या.

२) भिजवलेली मसुर ३ वाटी पाणी घालून  कुकरमध्ये दोन ते तीन शिट्टीमध्ये शिजवून घ्या. (जास्त शिटी देवू नये, मसूर अख्खा राहणार नाही)
३) कढईत तेल गरम करून त्यात सर्व खडा मसाला व १ चमचा जीरे फोडणीला घालून परतवून घ्या.

४) आता बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून विरघळेपर्यंत परतून घ्या. त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाका.
५) कांदा - टोमॅटो  चांगले परतवून त्यामध्ये जीरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट मिरची पावडर, हळद, घालून  चांगले परतवून घ्या.
६) आलं -लसूण पेस्ट घालून सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतवून त्यामध्ये शिजवून घेतलेले अख्खा मसूर घालून परतवून घ्या.
 ७) २ वाटी पाणी घालून उकळी येऊ द्यावी. आता चवीनुसार मीठ घालून अख्खा मसूर शिजवून घ्यावे.
८) उकळी आल्यावर अख्खा मसूरमध्ये अमूल क्रिम आणि वरतून कोथिंबीर घालून रोटी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत देखील खायला छान लागते.

     घरी ऐनवेळी एखादे पाहूणे आल्यानंतर जेवणाला काय करावे कळत नाही, अशावेळी आपण अख्खा मसूर करून पाहुण्यांना देखील खूश करू शकता.
( अख्खा मसूर झटपट करायचा असल्यास दोन शिटी जास्त द्यावी.)


Monday, June 1, 2020

स्वीट कॉर्न थालीपीठ


     पहिला पाऊस आणि गरमा गरम भजी आणि चहा मस्त कॉम्बिनेशन आहे ना. पावसाची सुरवात झालीयेच आता, मग करुयात एखादा गरमागरम पदार्थ.

मी नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन प्रयोग केलेल्या आणि थोड्या वेगळ्या प्रकाराच्या रेसीपी घेऊन येत असते, तसेच आज आपण भजीच्या ऐवजी थालीपीठ करणार आहोत. तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं? पण थालीपीठ थोडं वेगळंच आहे बरका! चला तर मग पाऊस आणि थालीपीठाचा आस्वाद घेण्यासाठी तयारीला लागूयात.


स्विट कॉर्न थालीपीठ :



साहित्य :




२ वाटी स्विट कॉर्न (मक्याचे दाणे), छोटा तुकडा आलं,६/७ पाकळ्या लसूण, ३/४ हिरवी मिरची, २ चमचे बेसन, १/२ चमचा जीरे, १/२ चमचा ओवा, १ बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चिमूटभर हळद, मीठ  चवीनुसार, तेल


कृती :



१) मक्याचे दाणे स्वच्छ धुवून त्यामध्ये आलं, लसूण, मिरची घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.


२) तयार झालेल्या वाटणात बेसन, जिरे, ओवा, कांदा, हळद, मीठ, आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

                                      

३) तयार बॅटर १० मिनिटे झाकून ठेवून द्यावे.


४) तयार झालेले बॅटरचे तव्यावर चमच्याने पसरवून थालीपीठ करुन घ्यावे. व गरमागरम थालीपीठ दही, पुदिना चटणी किंवा सॉससोबत खायला द्या.



     चवीला छान लागतेच आणि अगदी झटपट व सोपी अशी रेसिपी तुम्हीसुध्दा बनवून पावसात थालीपीठाचा आस्वाद नक्की घ्या.