Tuesday, April 28, 2020

Momos

     इंडियन स्ट्रीट फूड मध्ये गेले कित्येक वर्षे चायनीज फूडने भारतीयांना वेड लावलं आहे.  या चायनीज फूडची यादी देखील खूप मोठी आहे, आणि सर्व खव्वयांना त्याची चटक देखील लागली आहे.  मग त्यात येणारे चायनीज भेळ, पकोडे, मंचुरीयन, सुप्स, नूडल्स, चायनीज राइस, आणि बरेच काही पदार्थ.
     अरे हो मोमोज विसरले, ते कसे विसरून चालणार, ते सुद्धा आहेतच की,.....
     नाही हो विसरले नाही मी मुद्दामच ते लिहिले नाही, कारण ते काही चायनीज नाहीत बरं का, मोमोज चीनीइतकेच भारतीय आहेत. ठिक आहे तर मग आज मोमोज मूळचे कुठले आहेत आणि कसे आहेत ते पाहूयात.........

मोमो -

हा शब्द चीनी असला, तरी पदार्थ हा तिबेट मधून आलेला आहे. याला डंम्पलिंग, आणि डमसिम या नावाने सुद्धा काही प्रांतात ओळखले जाते.
मोमोज हा पदार्थ अँपटायझर्स मध्ये येतो. त्यांची ओळख ही  तिबेटियन प्रदेशातून झाली असून ती नेपाळमधील आणि भूतानमधील लोकांमध्ये तसेच सिक्कीम राज्य आणि  दार्जिलिंग, लडाख भागात सुद्धा प्रसिद्ध आहेत.
(पूर्व-दक्षिण आशिया सीमेच्या हिमालयी प्रदेशात व तिबेटमध्ये सर्वात लोकप्रिय फास्ट फूड हे मोमोज आहे. (तिबेट, भूतान, नेपाळ, दार्जिलिंग, लडाख))
दोन प्रकारांमध्ये मोमो मिळतात. १. व्हेज २. नॉनव्हेज आणि त्यामध्ये १) वाफवलेले  २) तळलेले असे दोन प्रकार मिळतात. आजकाल तंदूर आणि बेक मोमोज देखील मिळत आहेत.

व्हिट वेजी-नूडल्स मोमोज :
साहित्य :
१ वाटी गव्हाचे पिठ, २/३ चमचे तांदळाचे पिठ, १/२ पॅकेट नूडल्स, २ गाजर, १सिमला मिर्ची,१/२ पत्तागोबी, १ कांदा,  २ हिरवी मिरची, १ लसूण, आलं, १ कांदा पात(spring onion), १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, सोया सॉस, चिली सॉस, मिठ, तेल

कृती :
मोमोजच्या पारीसाठी:
प्रथम, १ वाटी गव्हाचे पिठ, २ चमचे तांदळाचे पिठ, मीठ, २ चमचे तेल घालून थोडेसे पाणी घालून कणिक मळून घ्या.
मऊसर व हाताला चिकटणार नाही अशी कणिक मळून १ तास ओलसर कपड्याने झाकून ठेवा.

वेज मोमोज स्टफिंग :
१) सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. नूडल्स उकडून घ्यावे.
२) एका कढईत तेल गरम करा, लसूण- आलं-हिरवी मिरची परतून घ्या. त्यानंतर कांदा टाकून गुलाबी रंग होईपर्यंत परता.
३) नंतर सिमला मिरची, कोबी, गाजर २ मिनिटे परतवून आता त्यामध्ये उकडलेले नूडल्स घालून वरतून थोडे मीठ टाकून परतवून घ्या
४) आता त्यामध्ये १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, २ चमचे सोया सॉस, १ चमचा चिली सॉस घालून कांदा पात (spring onion) घालून चांगले मिक्स करुन घ्या.
५) हे सारण थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.


Momos  कृती:
१) एक तासानंतर तयार केलेले पीठ घेवून त्याचे समान एकसारखे  गोळे करून घ्यावे.
२) त्या गोळीची पुरीच्या आकारात पोळी लाटून त्याच्या मध्यभागी तयार केलेले सारण भरून त्याचे वेगवेगळ्या आकाराचे मोमोज बनवून घ्यावे.
३) तयार केलेले मोमोज मोदक चाळणीला तेल लावून १०/१५ मिनिटे उकडण्यासाठी ठेवावे. (Steam Momos)
४)  हे तयार असलेले मोमोज गरम तेलात तळून घ्यावेत म्हणजे आपले  (Fry Momos)  तयार होतील.


   
     शेजवान चटणी सोबत या गरम गरम मोमोजची टेस्ट अजून वाढते.

Thursday, April 23, 2020

Old is Gold - डांगर

Old is Gold.....

     किती छान दिवस होते ना ते, आपला काळच वेगळा होता, आपल्या जमान्यात जी मजा होती ती या मुलांना काय कळणार ..........अशी अनेक उदाहरणं आपल्या मोठ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. मग रफी, बक्क्षी, आणि अजून बरेच गुणगुणायला लागतात.
    तुम्ही म्हणाल आज ही काय ८०/९० च्या जुन्या काळातील गाण्यांची यादी लिहून पाठवणार की काय?
     तर तसे काहीही नाही.......  खरंतर  old is gold असं म्हंटलं कारण आजची रेसिपी आहे ती माझ्या आजीच्या  काळातील व तिच्याच पद्धतीची अगदी सहज शक्य, सोपी आणि झटपट होणार अशी आहे.
     अलीकडच्या काळातील पिझ्झा, बर्गर खाणार्‍यांना या खमंग आणि रूचकर अशा गावाकडच्या पदार्थांनचीदेखील चव चाखता यावी.
     ही रेसिपी तुमच्याशी शेअर करण्याचं आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे, अशा जुन्या आणि पारंपरिक पाककृती नामशेष व लोप पावत चालल्या आहेत. तर त्या सतत लोकांसमोर आणण्याचा एक प्रयत्न.

आजची रेसिपी आहे,
डांगर 
साहित्य :
१ वाटी काळे उडिद (अख्खे), ३ कांदे, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ,

कृती :
१. काळे उडिद मंद गॅसवर कढईमध्ये चांगले भाजुन घेतले.
२. थंड झाल्यावर ते मिक्सर मधून बारीक करून घ्यावे थोडे रवाळ असेल तरी चालेल.
३. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, मीठ (प्रमाण चवीनुसार), दोन चमचे पाणी घालून चांगले एकत्र करून घ्यावे  वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाकरी बरोबर खायला द्यावे.
     झाली ना झटपट रेसिपी, पण त्याहीपेक्षा त्याची जी चव आहे ना ती अप्रतिम अहाहा!
     पावसाळ्यात हे काळ्या उडीदाचे डांगर खाल्याने शरीराला उष्णता मिळते. माझ्या आजीने आम्हाला असेच करून खाऊ घातले आणि आम्ही आजही हे डांगर विसरलो नाही.
     ह्या अशा जुन्या आणि लोप पावत चालल्या पाककृतींना उजाळा देण्यासाठी आपला हा उपक्रम काही दिवस असाच सुरू ठेवूयात.........चालेल ना मग... ....Old is Gold.....

   


Monday, April 20, 2020

चॉकलेट व्हिट केक


                          चॉकलेट व्हिट केक 

       वाढत्या लाॅकडाऊनमुळे सर्व खाऊचे चोचले बंद झाले, त्यामुळे मुलांना चटपटीत खाण्यासाठी काय करावे हा सारखा प्रश्नच पडायचा आणि त्यांची देखील फर्माईश होतीच. बरेच प्रकार करूनही झाले (घरगुती सामाणामधूनच) चायनीज, पंजाबी, पनीर डिशेस (सोयाबीन पासून बनवलेले) वगैरे.....         
      आता तर चॉकलेट्स, आयस्क्रिम किंवा केकची फर्माईश झाली. बऱ्याचदा नकार दिला पण सारख नाराज झालेल्या मुलांना काही तरी स्वीट डिश हवीच होती, मला ते फक्त
ओपशन्स सुचवत होते.
      मग ठरवलं एकदाच, चॉकलेट केक करायचा हे सगळं त्यांच ठरवून झालं पण मला मोठा प्रश्न पडला तो सामान कुठून आणणार? ............एरव्ही केक करताना कधीच प्रश्न पडले नाहीत, कारण नेहमीच मला केकच्या ओर्डर असतात.
      बराच वेळ विचार करून मी चॉकलेट केक केला, तो ही  गव्हाच्या पिठाचा घरगुती साहित्यामधूनच आणि महत्त्वाचे म्हणजे पौष्टिकता वाढवेल असा, खूप डिलीशीयस झाला. पहा तर मग चॉकलेट व्हिट केकची जादू........

चॉकलेट केक :                  
(गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक )
साहित्य :
गव्हाचे पीठ १ वाटी, साखर १/२ वाटी, ३ अंडी,  खायचा सोडा पाउण चमचा, वेलचीपूड, जायफळ, सनफ्लाॅवर तेल २/३ टी स्पून
कृती :
१. प्रथम गव्हाचे पीठ आणि खायचा सोडा दोन-तीनवेळा चाळून घेतला.
२. अंडी आणि साखर डबल बॉयलरवर फेटून घेतली, फेटलेले मिश्रण चांगले डबल झाल्यावर त्यामध्ये चिमूटभर वेलचीपूड व जायफळपूड, सनफ्लाॅवर तेल २/३ टी स्पून घालून मिश्रण एकत्र करून घेतले.
३. त्यानंतर गव्हाचे पीठ (कट अँड फोल्ड मेथड वापरावी) वरील मिश्रणामध्ये थोडे थोडे करून तीन विभागात घालून चांगले फेटून घेतले.
४. एका ग्रीस केलेल्या म्हणजेच तेलाचा हात फिरवून घेतलेल्या केक टीनमध्ये हे मिश्रण ओतावे.
५. प्री हिट केलेल्या ओव्हन मध्ये १८०ं वर २० मिनिटे बेक करून घ्यावा. ओव्हन नसल्यास कुकरमध्ये एक भांडे उपडे ठेवून त्यावर केकचे मिश्रण असलेले भांडे ठेवून कुकरची वायर न घालता १५ ते १८ मिनिटे मध्यम आचेवर ठेवून केक बेक करा.
(माझे प्रमाण नेहमी ग्रॅममध्ये असते आज वाटीचे दिलेले आहे. आणि केक हा प्रमाण घेवूनच करावा नाहीतर खराब होतो.)
चॉकलेट सॉस :
खरतर घरी काहीच नसताना चॉकलेट सॉस बनवलेली ही रेसिपी. माझ्याकडे कॉफी पावडर होती, १/२ चमचे कोको पावडर सुद्धा सापडली,(योगायोगने चोको चिप्सचे पॅकेट मिळाले) आणि साखर घेतली.
प्रथम साखर ५ चमचे घेऊन ती बुडेल इतके पाणी घालून कॅरमल करायला ठेवले आणि ती कॅरमलाइज व्हायच्या आत कॉफी पावडर ४  टी स्पून, १ ते २ चमचे कोको पावडर घालून चांगले एकजीव करून त्याचा चॉकलेट साॅस बनवला. (चवीत फार फरक नाही पडला चॉकलेट सॉस सारखीच चव होती.)
तयार झालेल्या केकवर हा चॉकलेट सॉस ओतून वरून चोको चिप्स पसरवले.
आहे ना भन्नाट कल्पना..... ..चला तर मग चॉकलेट केक करायला घ्या.


Saturday, April 18, 2020

स्पेशल मिसळ




       तोंडाला पाणी सुटलं ना..... नुसता फोटो पाहून, आज आपण झणझणीत कोल्हापूरी मिसळ बनवणार आहोत.
       मिसळचा इतिहास जर पहायचा झाला तर महाराष्ट्रातच उदयास आलेला असून त्याबाबत अनेक किस्से वाचनात येतात. अलीकडेच एक लेख वाचला होता, छ. शाहू महाराजांच्या काळात महाराजांना भूक लागली होती आणि त्यांच्या आचारींनी त्यांना स्वयंपाक घरात जेवण काही नसल्याने जे काही पदार्थ शिल्लक होते ते एकत्रित करून असा एक नवीन पदार्थ खाऊ घातला आणि तो महाराजांना इतका आवडला की त्याची वारंवार मागणी होऊ लागली. (किस्सा मोठा असल्याने थोडक्यात मांडला आहे.) आणि तेव्हांपासून मिसळचा शोध लागला, आणि ही स्पेशल मिसळ प्रचलित झाली.
       तसे पाहता आता प्रत्येक ठिकाणी आपापल्या शहर/गावांच्या नावांनी स्पेशल मिसळ मिळत आहे, जसे पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ, नागपूरी मिसळ इ........
       आजकाल तर मिसळचा थाटच न्यारा पहायला मिळत आहे. कुठे पोहे घालून, तर कुठे थाली सजवलेल्या स्वरुपात अशा किती तरी नावीन्यपूर्ण प्रकारात मिळणारी ही स्पेशल मिसळ बनवूया माझ्या कोल्हापूरी पद्धतीने.

कोल्हापूरी स्पेशल मिसळ 
साहित्य :
१-१/२ वाटी मटकी, ३ बटाटे, ४ कांदे, ३ टोमॅटो, ओला नारळ, आले छोटा तुकडा, ७-८ पाकळ्या लसूण, हिरवी मिरची, कोल्हापूरी तिखट मसाला, ३/४ लवंगा, १/२ मीरे, १ दालचीनी, कडीपत्ता, जीरे-मोहरी, तेल, कोथिंबीर, लिंबू, ब्रेडचे स्लाईस, फरसाण,
कृती :
१. प्रथम आले लसूण पेस्ट करून घ्यावी, ओलं खोबरं त्यामध्ये जीरे, लवंग, मीरं, दालचीनी एकत्र मिक्सर मधून बारीक  वाटण करून घ्यावे. कांदा उभा चिरून घ्यावा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
२. १/२ चमचा तेल गरम करून मटकी चांगली परतून घेऊन १-१/२ ग्लास पाणी घालून ती कुकरमध्ये २ शिटीमध्ये उकडून घ्यावी आणि त्याचबरोबर बटाटे वेगळे उकडून घ्यावे, बटाट्याची साले काढून घ्यावी. व बटाट्याची जास्त कांदा घालून हिरव्या मिरच्या-आले-लसूणचे वाटण करून भाजी बनवून घ्यावी.
३. एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात जिरं - मोहरी - कडीपत्ता फोडणीला टाकावे, उभा चिरलेला कांदा टाकून लालसर रंगावर परतून घ्यावा, नंतर टोमॅटो घालून तो चांगला विरघळेपर्यंत परतून घ्यावा.
४. नंतर आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे, त्यानंतर वरील खोबऱ्याचे वाटण घालून चांगले एकजीव परतून घ्यावे या सर्व मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतावे. कोल्हापूरी तिखट मसाला व मीठ, हळद घालून चांगले परतून घ्यावे.
५. आता यामध्ये तयार केलेली बटाट्याची भाजी घालावी आणि शिजवून घेतलेली मटकी घालून चांगले मिक्स करुन चांगली रस्सेदार मिसळ कट सुटेपर्यंत उकळी येऊ द्यावी.

      तयार मिसळचा रस्सा खाण्यासाठी घेताना एका प्लेटमध्ये फरसाण घेवून हा कटाचा गरमागरम रस्सा त्यावर ओतून वरून कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू आणि यासोबत मिळणारा कोल्हापूरी पावाची स्लाइस असेल तर चवच न्यारी.............. व्वा काय बेत झालाय.




Thursday, April 16, 2020

रूचीपर्णा 
(पहिला प्रयत्न)
झटपट आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने करता येईल अशा पदार्थांची खवय्येगीरी सर्वांसाठी घेऊन येत आहे त्याचबरोबर,
मी तुम्हाला ओरीजिनल रेसिपी मध्ये  माझ्या स्वतःच्या आयडिया घेऊन केलेल्या आणि काही माझ्या स्वतःच्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. चला तर पाहूया..........

कडक उन्हाळ्यात थंड सरबत, कोकम किंवा ऊसाच्या रसाची चव घेतली नाही तर तो उन्हाळा कसला,  म्हणूनच तुमच्यासाठी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची मेजवानी घेऊन येत आहे.
भारतीय पदार्थांमध्ये सरबतांचे अनेक प्रकार पहायला मिळतात. लिंबू सरबत, खस, आवळा, किंवा ताज्या फळांचे  सरबत (यांच्या रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या असून त्या देखील पुढील भागात देईन) इ. पण आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारात मोडणारी सरबतं रिफ्रेशमेंट म्हणून पाहणार आहोत, ते म्हणजे 'माॅकटेल'.

माॅकटेल : Moctails
माॅकटेल हे एक नाॅन-अल्कोहोलिक ड्रिंक आहे. १९८० पासून पाश्चात्य देशांमध्ये समारंभात किंवा पार्ट्यांमध्ये  कोल्ड- ड्रिंक्सची जागा या माॅकटेलनी घेतली आणि आज भारतात देखील विविध माॅकटेल्स प्रचलित झाली आहेत.

Virgin Mojito : 'वर्जीन मोयीतो' मूळात हा स्पॅनिश शब्द. इंग्रजी मध्ये लिहीताना  Mojito असा लिहीला जाणारा शब्द मोयीतो असा बोलला जातो. पाहूयात साहित्य......
साहित्य :
पुदिन्याची पानं, लिंबू व लिंबाचा रस, सफरचंद, बर्फाचे तुकडे, बारीक साखर, सोडा बाॅटल, आवश्यक असल्यास मीठ
कृती :
        एक ग्लास घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पानं आणि लिंबूच्या दोन-तीन चकत्या, दोन चमचे साखर व चवीपुरते मीठ टाकून मडलरच्या (लाकडाचे खलबत्तासारखे असते) सहाय्याने एकजीव करून घ्यावे. ग्लासमध्ये तीन-चार बर्फाचे खडे टाकावे. एकजीव केलेल्या मिश्रणात एक ग्लास सोडावाॅटर आणि सफरचंदाचे एकदम बारीक केलेले तुकडे घालून चमच्याने ढवळून पिण्यासाठी द्या .

Watermelon Mojito :
साहित्य :
पुदिन्याची पानं, लिंबू व लिंबाचा रस, कलिंगड, बर्फाचे तुकडे, बारीक साखर, सोडा बाॅटल, Sprite आवश्यक असल्यास मीठ
कृती :
        एक ग्लास घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पानं, कलिंगडाचे काप, लिंबूच्या दोन-तीन चकत्या, दोन चमचे साखर व चवीपुरते मीठ टाकून मडलरच्या सहाय्याने एकजीव करून घ्यावे. ग्लासमध्ये तीन-चार बर्फाचे खडे टाकावे. एकजीव केलेल्या मिश्रणात अर्धा ग्लास सोडावाॅटर आणि Sprite softdrink घालून चमच्याने ढवळून झटपट पिण्यासाठी द्यावे.

                           


अशा विविध फळांपासून आपण वेगवेगळे मोयीतो माॅकटेल्स बनवू शकतो. जसे की, ओरेंज मोयीतो, किवी मोयीतो, ब्लॅकबेरी मोयीतो, पायनॅपल मोयीतो, मँगो मोयीतो, स्ट्रॉबेरी मोयीतो इ......