Monday, April 20, 2020

चॉकलेट व्हिट केक


                          चॉकलेट व्हिट केक 

       वाढत्या लाॅकडाऊनमुळे सर्व खाऊचे चोचले बंद झाले, त्यामुळे मुलांना चटपटीत खाण्यासाठी काय करावे हा सारखा प्रश्नच पडायचा आणि त्यांची देखील फर्माईश होतीच. बरेच प्रकार करूनही झाले (घरगुती सामाणामधूनच) चायनीज, पंजाबी, पनीर डिशेस (सोयाबीन पासून बनवलेले) वगैरे.....         
      आता तर चॉकलेट्स, आयस्क्रिम किंवा केकची फर्माईश झाली. बऱ्याचदा नकार दिला पण सारख नाराज झालेल्या मुलांना काही तरी स्वीट डिश हवीच होती, मला ते फक्त
ओपशन्स सुचवत होते.
      मग ठरवलं एकदाच, चॉकलेट केक करायचा हे सगळं त्यांच ठरवून झालं पण मला मोठा प्रश्न पडला तो सामान कुठून आणणार? ............एरव्ही केक करताना कधीच प्रश्न पडले नाहीत, कारण नेहमीच मला केकच्या ओर्डर असतात.
      बराच वेळ विचार करून मी चॉकलेट केक केला, तो ही  गव्हाच्या पिठाचा घरगुती साहित्यामधूनच आणि महत्त्वाचे म्हणजे पौष्टिकता वाढवेल असा, खूप डिलीशीयस झाला. पहा तर मग चॉकलेट व्हिट केकची जादू........

चॉकलेट केक :                  
(गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक )
साहित्य :
गव्हाचे पीठ १ वाटी, साखर १/२ वाटी, ३ अंडी,  खायचा सोडा पाउण चमचा, वेलचीपूड, जायफळ, सनफ्लाॅवर तेल २/३ टी स्पून
कृती :
१. प्रथम गव्हाचे पीठ आणि खायचा सोडा दोन-तीनवेळा चाळून घेतला.
२. अंडी आणि साखर डबल बॉयलरवर फेटून घेतली, फेटलेले मिश्रण चांगले डबल झाल्यावर त्यामध्ये चिमूटभर वेलचीपूड व जायफळपूड, सनफ्लाॅवर तेल २/३ टी स्पून घालून मिश्रण एकत्र करून घेतले.
३. त्यानंतर गव्हाचे पीठ (कट अँड फोल्ड मेथड वापरावी) वरील मिश्रणामध्ये थोडे थोडे करून तीन विभागात घालून चांगले फेटून घेतले.
४. एका ग्रीस केलेल्या म्हणजेच तेलाचा हात फिरवून घेतलेल्या केक टीनमध्ये हे मिश्रण ओतावे.
५. प्री हिट केलेल्या ओव्हन मध्ये १८०ं वर २० मिनिटे बेक करून घ्यावा. ओव्हन नसल्यास कुकरमध्ये एक भांडे उपडे ठेवून त्यावर केकचे मिश्रण असलेले भांडे ठेवून कुकरची वायर न घालता १५ ते १८ मिनिटे मध्यम आचेवर ठेवून केक बेक करा.
(माझे प्रमाण नेहमी ग्रॅममध्ये असते आज वाटीचे दिलेले आहे. आणि केक हा प्रमाण घेवूनच करावा नाहीतर खराब होतो.)
चॉकलेट सॉस :
खरतर घरी काहीच नसताना चॉकलेट सॉस बनवलेली ही रेसिपी. माझ्याकडे कॉफी पावडर होती, १/२ चमचे कोको पावडर सुद्धा सापडली,(योगायोगने चोको चिप्सचे पॅकेट मिळाले) आणि साखर घेतली.
प्रथम साखर ५ चमचे घेऊन ती बुडेल इतके पाणी घालून कॅरमल करायला ठेवले आणि ती कॅरमलाइज व्हायच्या आत कॉफी पावडर ४  टी स्पून, १ ते २ चमचे कोको पावडर घालून चांगले एकजीव करून त्याचा चॉकलेट साॅस बनवला. (चवीत फार फरक नाही पडला चॉकलेट सॉस सारखीच चव होती.)
तयार झालेल्या केकवर हा चॉकलेट सॉस ओतून वरून चोको चिप्स पसरवले.
आहे ना भन्नाट कल्पना..... ..चला तर मग चॉकलेट केक करायला घ्या.


9 comments: